होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक ! इराणचा मात्र अमेरिकन फायटर जेटला पाडल्याचा दावा...

Foto
वॉशिंग्टन  : इराण ज्या 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'वर आपला हक्क सांगत जहाजांकडून लाखो डॉलर्सचा टोल वसूल करत होता, आता तिथेच युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिकेने इराणचे 'प्राईड' मानल्या जाणाऱ्या केशम बेटावर भीषण हल्ला केला असून, तेथील बंदर आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. 'कोपरनिकस सेंटिनल-२' या सॅटेलाईटद्वारे मिळालेल्या फोटोंमध्ये केशम बंदरातून धुराचे लोट निघताना स्पष्ट दिसत आहेत.

लर्क आणि केशम बेटांच्या मधून जाणाऱ्या जहाजांकडून इराणने जबरदस्तीने टोल वसूल करण्यास सुरुवात केली होती. काही तेलवाहू जहाजांना तर २० लाख डॉलर्स (सुमारे १६ कोटी रुपये) मोजावे लागत होते. अमेरिकेने नेमका याच बहमन व्यापारी बंदरावर आणि मासेमारी घाटावर हल्ला करून इराणची आर्थिक नाडी आवळली आहे. १ एप्रिल ते २ एप्रिल दरम्यान झालेल्या या हल्ल्यात बंदराचा किनारा पूर्णपणे तुटल्याचे सॅटेलाईट फोटोंमध्ये दिसत आहे.

विमानावरून दोन्ही देशांचे दावे-प्रतिदावे

इराणचा दावा: इराणच्या IRGC ने असा दावा केला आहे की, त्यांनी केशम बेटाच्या वर एका शत्रूच्या (अमेरिकन) फायटर जेटला पाडले आहे. याचे व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमेरिकेचे उत्तर: अमेरिकेने इराणचा दावा फेटाळून लावला आहे. "आमचे कोणतेही विमान पडलेले नाही, इराणने गेल्या काही दिवसात ६ वेळा खोटे बोलले आहे," अशी टीका अमेरिकन संरक्षण विभागाने केली आहे.

केशम आयलंड: पर्यटनाचे केंद्र की मिसाईल शहर?
५५८ चौरस मैलावर पसरलेले केशम बेट शांतता काळात एक पर्यटन स्थळ आहे. मात्र, इराणने या बेटाच्या खाली एक 'मिसाईल शहर' वसवले आहे. येथूनच जहाजांवर हल्ले केले जातात. विशेष म्हणजे, १८६३ पर्यंत 'रॉयल इंडियन नेव्ही' या बेटावरून आपले कामकाज पाहत होती.

ट्रम्प यांचा अंतिम इशारा
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत इराणला इशारा दिला आहे. "इराणचा सर्वात मोठा पूल आता इतिहास जमा झाला असून तो कधीही बांधला जाणार नाही. अजून बरेच काही होणे बाकी आहे. खूप उशीर होण्यापूर्वी इराणने करारासाठी पुढे यावे," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.